Tuesday, November 4, 2008

टिंग्या



ऑस्कर साठी चर्चिला गेला असल्याने श्वासप्रमाणे अपेक्षा ठेऊन मंगेश हडवळेंचा टिंग्या बघायला घेतला. ज्वलंत विषय, उत्तम स्थळ निवड, चपखल भाषा, खोलवर उतरणारे पार्श्वगीत तसेच योग्य वातवरण निर्मिती मुळे पहिल्या पाच-दहा मिनिटात या अपेक्षा अजूनच वाढू लागतात. परंतू दुर्दैवाने चित्रपट पुढे सरकने हळूहळू बंद पडते की काय येवढा संथ होतो. काही वेळाने तर पुढे काय घडणार, कशा प्रकारचे संवाद ऐकायला मिळणार याचा सुद्धा अंदाज बांधता येऊ लागतो. अन टिंग्या ऑस्कर साठी का निवडला गेला नाही याची एक एक करत कारणे समोर येऊ लागतात.

शरद गोयेकर या बालकलाकाराने टिंग्याच्या व्यक्तिमत्वाला खूप चांगला न्याय दिला आहे. निरागस खेडवळ भाषा, बोलके डोळे, तुडतुडीत देहयष्टी व कमालीची भेदक संवादफेक यामुळे तो तारे जमीं पर च्या दर्शील सफारी पेक्षाही उजवा ठरला आहे. तरण्णून पठाण व अजित गावंडे या बालकलाकांचे कामही सफायीदार झाले आहे. पण बाकी कलाकार निवड कथेला न्याय न देणारी आहे. कर्जबाजारी व कष्टकरी शेतकर्‍याच्या भुमिकेत सुनिल देव टिंग्याचा बाप केवळ देहयष्टीनेच नव्हे तर चित्रपटाच्या आशयामुळे सुद्धा वाटत नाही. डोळे बंद करुन तुम्ही पाहिलेले, तुमच्या माहितीतले कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी आठवा व पुन्हा या कलाकाराच्या देहयष्टीकडे बघा म्हणजे मग मी काय म्हणतो आहे ते समजेल. गाल बसलेले आहेत? डोळे खोल चिंतेत आहेत? पोट पाठीला चिटकलेले आहे? नव्हे ना? म्हणून तर हे पात्र कथेला शोभत नाही. टिंग्याची आई, तसेच शेजारच्या कुटुंबातील प्रमुख पात्रे काही कमतरता सोडता बर्‍यापैकी चांगली जमली आहेत.

आता कथे बद्दल. कथेचा गाभा आहे एका मुलाचे त्याच्या बैलावरील प्रेम व त्याला या प्रेमाला मुकायला लावणारी त्याच्या कर्जबाजारी शेतकरी बापाची हालाखिची परिस्थिती. ही कथा दोन-तीन तास धगधगत जिवंत ठेवायला पुरेशी आहे. पण दिग्दर्शकाने अवास्तव व असंबद्ध विषय विनाकारण मध्ये आणून ताणले आहेत. जसे की मुंबईत दंगल सुरु असल्याने शेजार्‍याचा भाऊ तिकडे आडकला असल्याची घटना ही कथेचा केंद्रबिंदू असणार्‍या शेतकर्‍याला होणारा कर्जाचा तगादा या घटनेपेक्षा कितीपरी प्रखर करण्याचा प्रयत्न केला आहे. सावकार म्हणजे अगदी मनमोकळा माणूस आहे व हा कर्जबाजारी शेतकरी कसल्याही तगाद्यविना ते कर्ज फेडता येत नाही म्हणून जीवन संपवायला निघाला आहे हे पचने जरा जड होते. एक शेतकरी कुटुंबात वाढलेला असल्याने मला तरी असे वाटते की दिग्दर्शकाला हा भाग हाताळताच आलेला नाही. बैलाला विकण्याचा भाग मात्र फार छान जमवला आहे. कथेचा जास्त संबंध नसतानाही उगीच एका भटाच्या माध्यमातून हिंदूंच्या भक्तिप्रकारावर ताशेरे ओढलेले आहेत तर मुस्लिम धर्मावर जास्त श्रद्धा असल्याचा भाव निर्माण केला आहे. पिडीत शेतकरी भक्तिभावाने अंगारा आणन्यासाठी देवळात जातो तेव्हा भट समोरच्या नदीत धुणे धुणार्‍या बाईसोबत चावट नजरा नजरी करत असतो. मात्र त्याच वेळी मुस्लिम शेजारणीने ताईत देण्याची घटना खूप आदराने सादर केली आहे. यामुळे कथेला राजकारणाचा पिंड मिळाल्या सारखा वाटतो.

पार्श्वसंगित सुरुवातीला घेतलेला पगडा टाकून देऊन शेवटी शेवटी रटाळ वाटू लागते. "माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला दे" हे तेच तेच ऐकवत ऐकवत चित्रपटाचे पार्श्वसंगित गुंडाळले आहे. चित्रिकरण मात्र चांगले झाले आहे. कोठेही विसंगती नाही वा चकचकाट दाखवण्याच्या मागे लागून मूळ स्थळांपासून दूर रम्य स्थळे दखवून सवंगपणा आणलेला नाही.

चित्रपटाचा शेवट काय होणार याची झलक सुरुवातीच्या दोन्-चार मिनिटांत दाखवलेली असल्याने शेवट कळलेला असतोच. परंतू दिग्दर्शकाने विषेश लक्ष घालून शेवटचा भाग बनवताना ताळमेळ घातलेला असल्याने शेवटच्या टप्प्यात चित्रपट पुन्हा रुळावर येतो व शेवट गोड होतो.

टीप:
हा लेख येथे पूर्व प्रकाशित केलेला आहे.

1 comment:

P A Ramchandra said...

आपल्या ह्या अनुदिनीवरील परीक्षणे आवडली. चित्रपटाच्या तांत्रिक बाबींकडेही चांगली टिपण्णी आहे. आपण आणखी परीक्षणे लिहावीत ही विनंती.